काव्यगुंता

वृक्षी रोडावलेलं ,मुळाशी बांधलेलं 
पर्ण पर्ण दाटलेलं , देठाशी संधालेलं 
भृगासी भावलेलं , फुलाशी सामावलेलं 
ते काव्य असतं आधी बिजासी अंकुरलेल 

श्रावणात बरसलेलं  , मृदेत मधाळलेलं 
 हिवाळी गोठलेलं ,बर्फाखालून वाहिलेलं 
 ग्रीष्मात पोळलेलं , छायेखाली सावरलेलं 

ते काव्य असतं ऋतूतून उजाडलेलं 
वेदनेत ढेचाळलेलं , निर्दय घाव सोसलेलं 
कंठ कंठ दाटलेलं , आरोळीत हाकलेल 
नसानसात कोरलेलं , रक्तात उरलेलं 
ते काव्य असतं जखमेत पेरलेलं 

सुख गोठून गोठलेलं , दुख घोटून घोटलेलं 
सुख गोठून भरलेलं , दुख घोटून मुरलेलं 
सुख दुख भोगलेलं , तरीही जे उरलेलं 
ते काव्य असतं आयुष्यात गोंदलेलं 

घराच्या घरात रंगलेलं , अंगाखांद्यावर रूळलेलं 
अंगणात खेळलेलं , खेळत अंगणाबाहेर गेलेलं 
कुंपणाबाहेर दिसलेलं , त्यान वळून न पाहिलेलं 
 ते काव्य असतं आईच्या डोळ्यात पाणावलेलं 

भक्तीत कुरवाळलेलं , मायेत गोंजारलेलं 
निराकार रुंदावलेलं , मूर्तीत पुजलेलं 
मातृहृदयात निद्रावलेलं , अंगाईत गायलेलं 
ते काव्य असतं साऱ्यात गुंतलेलं 

                                   कवी  (कमलेश पाडळकर)






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने