हिजडा - एक सत्यकथा

Pic by - Dr. Shahaji Mote-Patil


         मी आणि माझा मित्र डॉक्टर आप्पा कटरे.. जिथे आम्ही एम डी- एम एस (MDMS) करतो त्या इलकलमधील मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी चिपळूणहुन विजापूरला जाणार्‍या कर्नाटकच्या एसटीमध्ये बसलो होतो .. चिपळूण सोडलं तेव्हा संध्याकाळीचे सात वाजले असतील. रात्रभरचा प्रवास करायचा होता .... आरामात झोपता येईल हा विचार करून बसलो ... आम्ही दोघे जण तीन लोक बसतील अश्या सीटवर बसलो... बाकी गाडी भरलेलीच होती.

         बस रात्री १०:०० वाजता कर्र असा ब्रेकचा आवाज करत कराड एसटी स्टँडवर बस थांबली... उतारूंची लगबग सुरु झाली ...बस तशी अगोदरच भरलेली होती ...तेवढ्यात एक हिजडा (स्त्री वेशातला) आमच्या सीट जवळ आला आणि हातातली पिशवी आमच्या जवळ ठेवून खाली उतरला ...आमच्या पलीकडेच्या सीटवर बसलेली ..४५ ते ५० वर्षाची मुस्लिम बाई आमच्याकडे बघत बोलली त्याला तिथं बसू देऊ नका ...दुसरीकडे पाठवा ...( कदाचित  प्रवासात आमचं कस होईल म्हणून बोलली असावी ! ) पण आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो, कारण तिसरी जागा मोकळी असताना आमच्या शेजारी बसू नको असं कोणाला कसं म्हणू शकतो ..?


            एसटी सुरु झाली तसा तो हिजडा आत आला आणि मधल्या सीटवर बसलेल्या आप्पाला त्याने सरकायला सांगितलं ... मी आत थोडेसे  खिडकी कडे सरकलो ...अप्पा माझ्याकडे सरकून बसला .. हिजड्याला बसायला जागा करून दिली ... हे सगळं चालू असताना बसमधले सगळे प्रवासी आमच्याकडे एकटक बघत होते.. हिजडा येऊन बसायच्या आधीची त्यांची आमच्याकडे बघत असलेली नजर आता बदलली होती. . ते आमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले होते .. जणू काही आम्ही कोणाचा तरी खून करून बसलो आहे ... त्या सगळ्यांच्या नजरेत आमच्या विषयी एक प्रकारची घृणा जाणवत होती .. आमच्या शेजारच्या सीटवरील बाई तर असं काही बघत होती की जणू काही आमची अब्रू लुटली गेली आहे ...आम्हाला मात्र त्या हिजड्याबद्दल वेगळं असं काहीच वाटत नव्हते.. आम्ही त्याला फक्त एक माणूस म्हणूनच बघत होतो.


        रात्रीचे १०:३० वाजले एसटीने विटा बसस्थानक सोडलं तसं ड्रायव्हरने आतील लाईट घालवली.. त्या बरोबर आम्हाला पण थोडीशी भीती वाटायला लागली ... दोघांच्या.मध्ये अप्पा बसला होता. हिजडा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला ... नंतर वाऱ्याची झुळूक येताच मी पण डुलक्या घ्यायला लागलो ... संधी असतानाही त्या हिजड्याने मात्र आमच्या सोबत कोणतेही अश्लिल चाळे अथवा असभ्य वर्तन केले नाही.


        पहाटे तीन वाजता त्या हिजड्याने आमच्याकडे पाणी मागितलं ... बाटलीच्या तळाशी एकदोन घोट पाण्याचे उरलेले होते... ती बाटली आम्ही त्याला दिली ... पाणी पिऊन झाल्यावर Thank you Brothers ..असं म्हणून त्याने आमच्या सोबत बोलायला सुरुवात केली .. एव्हाना गाडीतली लाईट सुरु झाली होती, कारण बस विजापूरच्या जवळ पोहोचली होती ...तो शुद्ध इंग्रजीमध्ये बोलत होता म्हणून आमचं कुतूहल वाढलं होतं. आम्ही त्याला विचारलं, इतकं चांगलं इंग्लिश. कसे काय...? यावर तो उत्तरला की, मला चार भाषा येतात माझं शिक्षण Bsc नर्सिंग झालं आहे ...आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला...! आम्ही इलकल या शहरात जाणार होतो तिथल्या एका शिक्षक मित्राला त्याने फोन करून सांगितलं की, दोन डॉक्टर आहेत.. नवीन आहेत आपल्या भागात. .. या दोघांना काही अडचण आली तर मदत करा ...आमचे फोनवरील व्यक्ती बरोबर बोलणंही करून दिलं.


        आमच्या सोबत बोलताना तो त्याच्या मनातील खंत सांगून गेला, ..."जरी आम्ही शिक्षित झालो ...कितीही चांगलं वागलो ..तरी आम्हांला समाज स्वीकारत नाही ....आताचेच उदाहरण घ्या ना .. ती बाई कसं विचित्र नजरेनं बघतेय आपल्याकडे ...आम्हाला बाकी काही नकोय ... आमची एकच ईच्छा आहे, ती म्हणजे समाजाने आम्हाला माणूस म्हणून स्वीकारावे ... बहुतांशी लोकांच्या मनात हिजडा म्हणजे फक्त अश्लील चाळे करणारा ...टाळ्या वाजवत भीक मागणाराच असतो.


        पहाटे चार वाजले.. बस विजापूर च्या बस स्थानकात थांबली. आम्ही उतरत असताना आमच्या आधी उतरून जाऊन तो हिजडा आम्हांला भेटायला परत आला आणि हात पुढे करत नवीन पाण्याची बाटली त्याने आमच्या हातात ठेवली ... मनाला चर्रर्र. झालं. ... आमच्याकडील एक ते दोन घोट पाणी पिल्याच लक्षात ठेवून त्याने पाण्याची भरलेली बाटली आणून दिली होती...लाजेने आमची मान खाली गेली ....इतके मोठं मन...जाणीव.. बस मधल्या तथाकथित संस्कारी, सुशिक्षित स्त्री- पुरुषांकडे १% तरी असेल का ? जाता जाता त्याने आम्हाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला ...' मी तुम्हां दोघांना कायम लक्षात ठेवेन, प्रवासात तुम्ही मला एक क्षणही मी तुमच्यापेक्षा वेगळी आहे हे जाणवू दिले नाही ..!"

    
        विजापूरच्या स्थानकात मसाले दूध पित असताना मनात विचार आला ...काही तासांच्या या प्रवासात तो खूप काही सांगून गेला होता ... माणूसकी काय असते ते शिकवून गेला..!


लेखन- डॉ शहाजी मोटे-पाटील


   




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने