एक त्सुनामी सरकारी 

पात्रे  

 १} तो                           (वय ४५ )
२} ती             (वय ४० )
३} कवी             (वय ३० )
४} समाजसेवक   (वय ४० )
५} प्रेमी             (वय २२ )
६} प्रेमिका     (वय २० )
७} अधिकारी     (वय ४५ )

प्रवेश पहिला 

(दृश्य : समुद्रकिनारा .  वेळ : सायंकाळी ४ नंतर प्रेक्षकांच्या दिशेलाच समुद्र आहे अशी संकल्पना .स्टेजवर मोठा घेर असणारे दोन पाईप्स , आडव्या स्तिथीत .दोन्हीची तोंडे एकमेकांकडे ,दोन्हीमध्ये साधारण पाच-सहा फुटाच अंतर .पाठीमागे थोड्या अंतरावर एक खडकवजा उंचावटा.त्याच्या मागे दूरवर उंच इमारती असे दृश्य .दोन्ही पाईप्समधील दृश्य प्रेक्षकांना दिसावे यासाठी प्रतिकात्मक (भासमान) अथवा काचेसम पाईप्स असाव्यात . यापैकी एका पाईपमध्ये साधारण ४५ वयाचा , साध्या , मळकट कपड्यातील पुरुष बसला आहे . तर दुसर्या पाईपमध्ये ४० वयाची सावळीशी स्त्री बसली आहे . दोन्ही पाईप्समध्ये काही तुटपुंजे प्रापंचिक साहित्य दिसते . दोघेही आपापल्या पाईपमध्ये काही कामात व्यग्र आहेत . अधूनमधून समुद्राची गात्र व वाऱ्याचे घोंघावणे ऐकू येते . साधारण तिशीतील एक तरुण येतो . तो कवी आहे . अंगात ढगळ गुरु शर्ट व पँट, गळ्यात शबनम . खडकाळ उंचवटयावर बसतो .समुद्राकडे पाहून खुष होतो .)
Image Source - Google | Image by - depositphotos



कवी :(उत्साहाने) व्वा , क्या बात है ! म्हणायचं निर्भेळ निसर्गसौंदर्य. दूर क्षितिजापर्यंत अव्याहत सळसळणारा हा अथांग सागर .पार टोकाशी सोनेरी झळाळी ल्यालेलं तांबूस आकाश आणि सर्वाला व्यापून उरणारी धीरगंभीर गात्र . हा आहे निसर्गाचा अदभूत कॅनव्हास आणि रंगाची अनोखी किमया . पण मग प्रशांतअसणारा हा सागर अशांत बरं होतो ? ओढीनं किनारयाला बिलगायला येणाऱ्या लाटा निष्ठुरपणे त्याच किनाररयावर प्रहर करून विध्वंस कशा करतात ? मला अत्यंत सुखद करणाऱ्या याच लाटा सुनामी नतात ! अरे , मला तर एक कविताच स्फुरायला लागलीय ...(जुळवीत पॅडवर उतरतो.)  
सागर किनारी आलो तेव्हा 
होतो किती अशांत मी !
मानवी पशूंच्या काँक्रीट जंगलात 
हतबल , हताश , क्लांत मी .
शोधतो सुख आथांग पसाऱ्यात 
अंतरी जेव्हा सुना मी .
सुखदपणाचा ओढून बुरखा 
नाही ना येणार त्सुनामी ?
धन्यवाद दर्यारजा, नाहीतर आमच्या या रुक्ष जीवनात प्रतिभेला वांझोटी करणारेच प्रसंग सतत वाट्याला येतात. आता पुढच्या भेटीसाठी तुला तात्पुरता रामराम करतो .
(कवी निघून जातो .इतकावेळ ऐकणारे ते दोघे फिदीफिदी हसतात .दोघेही बाहेर येऊन आळस झटकतात .)

तो : पाहिलंस , इथं दहा पंधरा मिनिटं बसल्या बसल्या त्या कवीला प्रतिभेच्या कळा सुटल्या आणि त्यानं एका गोंडस कवितेला जन्म दिला .
ती : (लटकेपणाने) हॅ, तू पण काय बाबा हैस ! कश्या शब्दात बोलतो तू!
तो : बये तुला राग यायचं काय कारण ? खरं तेच बोलतो मी. मला सांग आपण समुद्राच्या किनारी पडलेल्या पाईपात राहायला येऊन किती दिवस झाले असतील ?
ती : (अंदाजे) माप सात आठ महिने तरी .
तो : हो नां , इतक्या काळात तुला म्हण किंवा मला तरी चार ओळी लिहायला सुचल्यात ?
ती : (वेडावत) अँ, म्हण चार ओळी तरी ! त्याला डोकं असावं लागतं म्हाराजा , कुणाचंबी काम नव्हं ते .
तो : अगं ,मी आपल्या दोघांबाबत बोलत होतो .म्हणजे तुलाही डोकं नाही हे तुला मान्य आहे तर ! नाहीतर रोज शहाणपणाचा आव आणून माझं डोकं खात असतेस .
ती : म्हण बाबा म्हण .तू काय , मी काय आणि जवळपासच्या पाईपामधले शेजारी काय , आपण सगळे बिनडोकच . म्हणून तर शहराबाहेर किनाऱ्याला पडलेल्या या सिमेंटच्या पाईपात किड्याच जीण पत्करलय आपण !
तो : (गंभीरपणे) आता तू कशाला ऊगीच जखमा टोकारायला लागलीस ? अगं , आपण लोकांनी या पाईपात संसार मांडले ते काय हौस म्हणूंन ! परीस्थितीनं आमचं खेळणं केलं आणि समाजानं वाट्टेल तसं तुंबडलं .म्हणून उबगलो समाज नावाच्या त्या छळछावणीला. या पाईपात राहणारा प्रत्येक जीव नागवला गेलाय .म्हणूनच इथ प्रत्येकाचा एकट्याचा प्रपंच आहे , इथे दुसरया माणसावरचा विश्वास ठार मेलाय .
ती : खरंच ,हे तूच बोलतो का? गंभीर झालास म्हणजे किती छान नवलाच्या गोष्टी बोलतोस तूं !एखाद्या तत्वज्ञानी माणसासारखा .
तो : अग ,तसा मी तत्वज्ञ आहेच मुळी . लॉजिक विषय घेऊन फ़स्टृक्लासनं बी.ए. झालोच मी .पण आत्ताच्या जगात भाकारीपलीकड तत्वज्ञान कुणाला मानवत नाही . जग  एवढ व्यवहारी झालंय कि प्रसंगी तत्व गुंडाळून ठेवली जातात .निव्वळ बेरीज-वजाबाकी डोक्यात ठेवूनच मानसं वागायला लागलीत .त्यातून तुझ्या-माझ्यासारखी दळभद्री 
मानसं म्हणजे वजाबाकीतून उरलेली शून्ये .आता मला निवारा देणारी ही बेवारस पाईप आणि शेजारी ना नात्याची ना गोत्याची  अशी तू ,एवढीच काय ती जमेची बाजू माझी .(तो आत जाऊन बसतो )
ती : (दटावत) ऐ बस्स .एंवढया निराशेच्या गोष्टी नको करूं .अरे ,परमेश्वराकडे आपण काय मोठ-मोठे बंगले न पंचपक्वानं नाही मागत आता . हा आपला बिनघोर निवारा न कष्टाचा भाकर-तुकडा .
तो : 'बेगर्स आर नो चुजर्स ' म्हणतात ते यालाच . पाय पसरणं मुश्कील बनलं की असं पाय पोटाशी घेऊन जगणं आलंच .
ती : अरे , कुणीतरी येतंय बघ .... (तसा तो बाहेर येतो.)
तो : (तिकडे पहात) कुठं कोण आहे .
ती : (हसते) ऊगी गमंत केली तुझी .
तो : (थोडं बाजूला) हो पण इथं ये पाकीट कोण टाकून गेलंय ?
ती : (पटकन पुढ होते)पाहू .. कुठंय ?
तो : (हसतो)गुप्त झालं . आता कसं ?
(ती हिरमुसली होते .खादी शर्ट व विजार अशा पोशाखातील समाजसेवक प्र. क .) 
स.से.: नमस्कार ,मंडळी.
(तो व ती नमस्कार करतात ,चेहरे प्रश्नार्थक .)  
तो : अ .. आपण ?
स.से.:   मी या भागातील एक समाजसेवक सदा धडपडे . आपण माझे नाव ऐकून असाल. इथे राहता कि काय तुम्ही ?
तो : हो ,त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे ?
स.से.: नाही म्हणजे , या सिमेट पाईपात !तेही विराण समुद्रकिनारी ?
तो : सागर किनाऱ्याला कुणी विराण म्हणत नाही .
स.से.: मानवी वस्तीपासून बाजूला . जवळपास जंगली श्वापद...
ती : माणसापेक्षा ती बरीच असतात साहेब . ती उगीच कुणाच्या वाटेला जात नाहीत .
स.से.: त्यातून सतत हा भन्नाट वारा . खारा ,कुबट वास ...
तो : सगळ्याची आता सवय झालीय .आणि खारट,कुबट वास नाही कुठे ? ती तर मानवी वस्त्यांचीच देणगी आहे .शहरातल्या गटारी आणि नाल्यातून काय सुगंधी अत्तर वाहतंय ?
स.से.: तुम्ही फारच मार्मिक बोलता . शिकलेले दिसता ?
तो : ऊगी आपलं पोटापुरत .
स.से.: ही तुमची बायको का ?
ती : (ताडकन)ये सायबा , मी याची बायको नव्हे ,सांगून ठेवतो .
स.से.: (गडबडून)तसं नाही , दोघे एकत्र राहता म्हणून म्हटलं .
ती : एकत्र का ? ही पाईप माझं घर अन ती पाईप त्याचं . फक्त शेजार हाय आमचा संबंध . तुमच्या तिकडे उच्च वस्त्यात खुशाल राहतात बिनलग्नाचं ... नुसती शरीराची सोय .भांडण झालं कि वाट वेगळ्या ,ना घेणं नं देणं .तसं इथं नाही .
स.से.: माफ करा हं , माझा गैरसमज झाला .तरी किती लोक राहतात इथे ?
तो : साधारण वीस एक . पलीकडे उतारावर अजून काही पाईपा आहेत .
स.से.: बाकी काही म्हणा , एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ,कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधेशिवाय तुम्ही राहता .कमाल आहे .
तो : त्यात कसली कमाल ? अहो , तिकडे माणसांच्या गर्दीतसुद्धा कितीतरी मानसं उपेक्षितांच जिनं जगत असतात .त्यांच्यात व  आमच्यात फरक एवढाच आहे की दुःख देणारा समाज त्यांना हवासा वाटतो . आम्ही मात्र विटलोय त्या समाजाला . 
स.से.: (कौतुकाने)खूपच इंटरेस्टिंग .तुमचं हे जगणं ही आज एखाद्या चॅनेल ची 'ब्रॅकींग न्यूज' होऊ शकते .
तो : उबदार ,सुरक्षित निवारयाला राहणाऱ्यांना हे अप्रूपच वाटणार .पण, हा तर आमच्या नशिबाचा भोग आहे ,साहेब .
स.से.: परिस्थिती माणसाला 'टफ'बनवते हे खरंच .पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा , तुम्ही या स्वतंत्र देशाचे नागरीक आहात .चांगलं जीवन हा तुमचा हक्क आहे .
ती: (फणकारयाने)कसला डोंबलाचा हक्क घेऊन बसला साहेब ? तुमच्या समाजात मोठ्ठा अधिकारी म्हनून रुबाब दाखवणारा माझा नवरा एखाद्या रानटी पशूगत वागायचा माझ्याशी .अरे ,नेसत्या वस्त्रानिशी त्यानं मला घराबाहेर काढली तेव्हा कोणी आलं नाही , त्याला माझा हक्क सुनवायला .तुमच्यासारख्या लोकांसाठी या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत .
स.से.: समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्यात बाई .नाहीतर मग आमच्यासारखे समाजसेवक कशाला निर्माण झाले असते .कोणावर तरी जुलूम होताना सगळे नुसते बघेच असतात ,उद्या आपल्याशीही असं होऊ शकतं याचा विचारच कोण करीत नाही .तरीही सगळेच काय पाषाण झालेले नाहीत .हवं तर मी तुमच्या हक्कासाठी आवाज उठवतो , आहे तुमची तयारी ?
ती : (हात जोडून)नाही साहेब ,आता लढण्याची ताकद माझ्या या देहातली उरली नाही आणि मनातही .ज्या हक्काला मी स्वतःच लाथ मारून आलेय त्याचा आता विचारसुद्धा नकोय .
तो : होय साहेब , ती म्हणते ते खरं आहे .आता इथे या किनार कपारीत जे जीव जगताहेत ते समाजाच्या दृष्टीने मेलेले आहेत .आम्हाला कुणाशी काही घेणं-देणं नाही .इथे कुणाला फुक्कटही काही नको आहे .राबायचं आणि पोटासाठी लागेल तेवढाच भाकर तुकडा कमवायचा एवढाच जगण्याचा अर्थ इथे उरलाय .
स.से.: इतके निराश होऊ नका .आपण काही चळवळ करूया . तुम्ही काही एकटे नाहीत . मी आहे तुमच्यासोबत .
तो : माफ करा ,तुम्ही आमच्यात गुंतण्याचा प्रयत्न करू नका . अहो ,आमच्यापेक्षा कितीतरी महत्वाचे प्रश्न सरकारपुढे आहेत.आम्हाला आमच्या नशिबावर सोडा .
स.से.: (जडपणे)ठीक आहे     (समाजसेवक निघून जातो .)
ती : उगी डोकं खाल्ल .मोठ्ठा आलाय सोशलवर्कर !
तो : अगं ,त्याला कशाला दोष देते ? माणूस भला वाटला . (ती काही पुटपुटत आपल्या पाईपमध्ये जाते व तोसुद्धा त्याच्या पाईपमध्ये जातो . तेवढ्यात एक तरुण प्रेमी व प्रेमिका येतात व त्या उंचवटयावर बसतात .  )
प्रेमी :(खुशीने) वॉव ,काय हा देखावा ,मस्त एकांत .फक्त तू अन मी .
प्रेमिका : अहं ,अजून कोणीतरी आहे इथे !
प्रेमी : कुठं कोण आहे ? (पाईपमधील दोघे सावध होतात .)
प्रेमिका : (समोर बोट करीत ) हा काय अथांग सागर .
प्रेमी :(हसतो) अग ,तो तर आपला यार .आपल्या प्रेमाचा साक्षीदार .गेल्यावेळी आपण तो एक जुना पिक्चर पाहिलेला आठवतोय . 'एक दुजे के लिये 'मॅटिनीला ?
प्रेमिका : हो .त्याचं आणि काय?
प्रेमी : (तिरकसपणे)त्याचं इथे लोणचं घातलय .(ती लटक्या रागाने त्याला गुट्टा मारते.)
प्रेमिका : तू म्हणजे नां - सरळ सांग ना .
प्रेमी : अगं ,त्यामध्ये प्रेमी शेवटी स्वतःला सागर किनाऱ्याच्या कड्यावरून खाली झोकून देतात .आता आपण बसलोय तिथं पुढं काही अंतरावर तशीच निव्वळ खडकाळ घसरण आहे .
प्रेमिका : बरं आहे ,मग ?
प्रेमी : समाज उद्या आपल्याही प्रेमाला विरोध झाला तर हा स्पॉट तसा मस्तच आहे .
प्रेमिका : (दचकून)ऐ,मस्तच काय ?तू टिपिकल मजनूची भाषा बोलायला लागलास .आता जमाना बदललाय .
प्रेमी : मॅडम ,जमाना कोणत्याही शतकातला असला तरी तोस प्रेमाचा शत्रू असणारच आहे .
प्रेमिका : तुला अशी भीती का वाटावी ? अरे , माझ्या मम्मी-पप्पांचही लव्हमॅरेज होतं त्यामुळे आपल्या लग्नाला त्यांचा विरोध असणार नाही .
प्रेमी : अगं ,लव्ह-मॅरेज तुझ्या मम्मीपप्पांच झालंय ,माझ्या आई-बाबांचं नाही .त्याचं फक्त मॅरेज झालंय.त्यांच्यामध्ये लव्ह नावाचा काय प्रकार दिसत नाही ,तरीही आम्ही  चार भावंडे जन्माला आलो .
प्रेमिका : (स्मित करीत)अरे, वेड्या ,मुलं होण्यासाठी प्रेम लागतेच असे नाही .
प्रेमी : आई शप्पथ .तू म्हणतेस ते काही चुकीचं नाही .पूर्वी म्हणे लोक बायकांशी बोलत नसत पण तरीही आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी कुटुंब नियोजनाची सगळी रेकॉर्ड मोडून टाकल्यात .आज आमची मात्र पंचाईत झालीय ,हम दो हमारा किंवा हमारी एक .
प्रेमिका : ते एक बरं झालंय .तुम्हा पुरुषांना बाळंत व्हावं लागलं असतं नं मग कळलं असतं .
प्रेमी : अग, पण हे तू कसं सांगू शकतेस ?
प्रेमिका : पुरे हं ,प्राचीन काळापासून आम्ही स्त्रियांनी जे सोसलंय त्याने इतिहासाची पाने भरली आहेत .
प्रेमी : (मिश्किलपणे)मग आता त्यासाठी नवीन लेजर घालूया .मला सातच्या आत घरात पोहचायला हवं .
प्रेमिका : तुझं हे नेहमीचं आहे . मी मुलगी असूनदेखील थांबण्याची माझी तयारी असते आणि तू मात्र -
प्रेमी : लव्ह मॅरेज.तुझ्या मम्मीपप्पांचं लव्हमॅरेज झालंय नं ,पण -
प्रेमिका : (रागाने)हं ,हं , कळतो हं टोमणा .
प्रेमी : मस्त .अशी चिडलीस कि खुलून दिसतेस .
प्रेमिका : पुरे- असं म्हटलं कि झालं .थोबाडीत मारून सॉरी म्हणावं तसं .
प्रेमी : मग अजून काय करायला हवं ?
प्रेमिका : ते आता 'व्हॅलेटाईन'डे ला सांगते .जास्त वेट अॅण्ड वॉच .
प्रेमी : मला झेपेल असंच काहीतरी ठरव बाई .
प्रेमिका : ते बघू .आता आधी तिकडे रोडवर रेस्तराँमध्ये मस्त कोफी घेऊया अॅण्ड देन गुडबाय .
प्रेमी : ओ.के. बाय मीन्स .(दोघेही निघून जातात.ते गेल्याची चाहूल घेऊन तो बाहेर येतो .)
तो : ये s तू पण ये बाहेर .(ती बाहेर येते)काही म्हण ,आपली घरं -म्हणजे या पाईपा .खरंच एका रमणीय ठिकाणी आहेत .इथे येणाऱ्या प्रत्येकाला एका विराट सौंदर्याचा साक्षात्कार होतोय .आम्ही मात्र इथे राहूनही ते मुक्तपणे अनुभवलं नाही .
ती : अहो , सोक्रेटीस महाराज ,त्या प्रेमिकामुळे काही नवी दृष्टी प्राप्त झाली नाही ना ?
तो : या प्रेमिकांचं जगच न्यारं .त्यांना न कुणाची तमा न कशाची फिकीर .म्हणूनच एका विद्वानानं 'प्रेमी ,वेडे आणि कवी ' या सर्वाना  एका गटात घातलयं .पण -आजच्या पोरांचं प्रेम हे उत्तान आणि हिडीस होत चाललंय .
ती : प्रेमाची गल्लत शारिरीक आकर्षणाशी केली की तसंच होतं .
तो : एक सांगू-मला तर हे प्रेम बीम सगळं साफ झूठ वाटतंय .शेवटी सगळं शरीरापर्यंत जाऊन थांबणार .आता मघाशी तिच्यासाठी जीव  द्यायच्या गोष्टी करणारा प्रेमवीर एकदा तिला उबगला कि तिचा जीव घ्यायला उठेल .
ती : खरं बोललास .तुम्ही पुरुष हे असेच संधिसाधू .स्त्रीला एक भोगवस्तू मानणारे .
तो : बापरे , अख्या पुरुष जातीला का वेठीला धरतेस ?
ती : (विषन्नपणे) किती काळजावर दगड ठेवावा म्हटलं तरी ते मी विसरू शकलेली नाही .भावनांना किती बांध घालायचा ?
तो : (आपलेपणाने) अगं वेडे ,मग आता बांध घालूच नकोस .आजवर तू कधी बोलली नाहीस आणि मी सुद्धा विचारलं नाही .पण आता  बोलती हो .मनातल सगळं बोलून टाक .बरं वाटेल .
ती : (हरवल्यागत) कधीतरी मी एक मध्यमवर्गीय ,सुसंस्कृत घरातील कॉलेज शिक्षण घेणारी मुलगी होते .कार्पोरेशनमध्ये अधिकारी असणाऱ्या मुलाचं स्थळ आल म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडून घरच्यांनी माझं लग्न लावलं .लग्नानंतर तो मला पुढे शिकवणार होता .पण -कसलं काय ? म्हातारे सासू-सासरे आणि घरचं सर्व करता-करता दिवसाची रात्र केव्हा झाली कळलंच नाही .त्यातून त्याचं अधिकारी रुबाब .रोज दारू घोटून पार्ट्या झोडून उशिरा घरी यायचा .राबून अंग कसं आंबून गेलेलं असायचं पण त्याला मी फ्रेश हवी असायची .त्यातूनच कुरबुरायला,भांडायला लागला ,मार-झोड करायला लागला.तुझ्यात काही चार्म नाही म्हणायला लागला आणि कुठल्या नटमोगरीच गुण गायला लागला.माझ्या अंगाला लागेना. एखादे पोरबाळ व्हायचं तर कमकुवत प्रकृतीमुळे तिथेही अपयश.माहेरच्यांनीही माझ्याकडे पाठ फिरवली .आणि मग 'वांझोटी' किताब देऊन एक दिवस त्याने मला घराबाहेर काढली .जगण्याची वासनाच राहिली नाही म्हणुन आत्महत्या करण्यासाठी मी इथ आले,पण -तू रोखलंस,धीर दिलास. तुझ्या शेजारच्या पाईपमध्ये राहण्यास प्रवृत्त केलंस .अगदी निवांत मुक्त जगणं मलाही आवडलं .तिकडे कॉलनीत चार घरी धूण-भांडी करायची ..आणि या भक्कम पाईपचं घर मानून इथ विसावायचं ...निदान स्वाभिमानाच जगणं .
तो : (भावुकपणे)तुझ्या आणि माझ्या कहाणीत कितीसा फरक आहे ?तुला सैतान भेटला आणि मला उच्छशृंखल हडळ .चांगल्या चाळीत स्वताची खोली ,एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी ..सगळं होतं माझ्याकडे .एखादी चंचल स्त्री संसाराची कशी वाट लावू शकते ते अनुभवलं मी चार पैसे शिल्लक राहावेत ,अजून चांगलं जगता यावं .म्हणुन मी आपला ओव्हरटाईम करून राबत होतो .ती मात्र काही रंगेल बायकांच्या संगतीनं क्लब,पार्ट्या करायला लागली .काही श्रीमंत पुरुषांच्या रॅकेटमध्ये अडकली .ऐष आराम,शॉपिंग,शो यामध्ये आपण एका मध्यमवर्गीय माणसाची पत्नी आहे हेच विसरली.त्यातच कंपनीत संप झाला, माझी नोकरी गेली .आधीच तिच्यातील बदल पाहून मी तणावग्रस्त होतो. श्रीमंती शौक लागलेल्या स्त्रीला गरिबी रुचत नाही .एक दिवस घरातील महत्वाच्या चीजवस्तू घेऊन ती परागंदा झाली. तिने जागोजागी करून ठेवलेल्या 'क्रेडिट' बिलांची भरपाई करण्यात माझी खोली विकली गेली .एवढं सगळ पाहणाऱ्या सगे-सोयरे, शेजारी-पाजाऱ्यानी मलाच दोषी ठरवलं .तुला बायको सांभाळता आली नाही म्हणून माझा उपमर्द केला. नको नको वाटलं ती माणसं,ती वस्ती आणि मरायला या कड्यावर आलो.इथे अव्याहत उचंबळणारा सागर आणि क्षितीजापर्यंतचा अफाट पसारा पाहून मनाला उभारी आली .माझ्याप्रमाणे नागवल्या गेलेल्यांची ,वाचा हरवल्यासारखी शांत वसाहत पलीकडे पाईपात दिसली. इथे हे दोन पाईप रिकामे दिसले .वाटलं,कुणासाठी आपल्या सोन्यासारख्या आयुष्याला का नाकारायचं? मग या पाईपलाच घर मानलं .तिकडे आत स्टेशनवर हमाली करायची व मिळालेल्या पैशातून बस्स जीव जगवायचा .एकटा जीव सदाशिव .
ती : धन्य आहेस तू ,मलाही जगायला बळ दिलंस .
तो : वेडी आहेस.तू तर स्वतःच्या बळावरच जगलीस.पण,तू इथे आल्यापासून माझ्याही मनाला उभारी आली. आठवतंय,तुला म्हणालो होतो ,माझ्याजवळ राहा ,मी कमवून आणतो -तर केवढी डाफरलीस माझ्यावर ?
ती : मग तर काय करणार ?एकीकडे मिळवून आणलं असतस आणि वर माझ्यावर अधिकार गाजवू लागला असतास .बायको म्हणून एकदा अनुभव घेतला तेवढा पुरे होता मला .
तो : जाऊ दे .मला तर कुठं हौस होती नवरा व्हायची? आज असं शेजारी म्हणून भांडत जगण्यात जो आपलेपणा आहे तो मात्र राहिला नसता .तिकडं संभावितपणाचा आव आणणारे वासना वागवित जगताहेत पण आपलं हे फाटकं,उघडं जग मात्र वासनेच्या पलीकडे आहे .
ती : किती हा विरोधाभास ? लोकं शहराबाहेर समुद्राकाठी नको ती लफडी करायला येतात .त्याच ठिकाणी आपलं हे एक पवित्र ,भावनिक जग उभं आहे !
तो : खरंच, हे सुद्धा एक सुखच आहे .
ती : या सुखालाही कुणाची दुष्ट न लागो म्हणजे झालं .
तो : अगं ,समुद्री वादळ-वाऱ्याची संगतीत भूतासारखं राहतोय आपण .तुला अशी भीती का वाटावी ?
ती : म्हणजे, आज तिकडे स्टेशनवर तुला काही कळल नाही ? मी धुणं-भांडी करणाऱ्या घरी दुपारी टी.व्ही.वर सांगत होते.समुद्रात कुठंतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे  .
तो: अगं ,त्यांना त्सुनामी लाटा म्हणतात .मी देखील एकलय ते.पण त्याचा धोका पूर्व किनारपट्टीला आहे .आपल्या इथे अजिबात धोका नाहीय .
ती: शेवटी सगळं समुद्र एकच नाही का ? तसं झालं तर -त्या तिकडचा कोळीवाडा आणि आम्हा लोकांचा पहिला घास त्या लाटा घेणार .
तो : कशाला उद्याची काळजी करतेस (पुढे पहात) अस्मानी आपत्ती पुढे सगळेच हात टेकतात शेवटी. ते बघं -आजचा दिवस तरी संपतोय .तो सूर्याचा लाल गोळा अस्ताला चाललाय .....उद्यासाठी आपल्याला निरोप देतोय .(दोघेही एकटक पुढे बघत असताना अंधारुन येते .)

लेखन- प्रा. मोहन निकम -पाटील




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने