प्रवेश दुसरा
(स्थळ, दृश्य व वेळ पाहिल्या प्रवेशाप्रमाणेच.)
ती: अस्वस्थपणे पाईप जवळ घुटमळत आहे . मध्येच पाठीमागील उंचवटयापर्यंत जाते व वाटेच्या दिशेने पाहते ,व पुन्हा पाईपजवळ येते .थोड्याच वेळात हातात कॅरीबॅगसारखी पिशवी घेऊन तो प्र.क.)
ती: (त्राग्याने)केव्हाचा येतो आहेस?अजून तासभराने तरी नाही का यायचास!
तो: काय?नेहमीप्रमाणे फारतर अर्धा तास उशील झाला असेल.अजून तो सूर्याचा गोळा लाल व्हायचाय .आत्ता कुठ साडेपाच वाजले असतील .त्यातून,दिवस थोडा मोठा आहे .
ती: असुदे.एकेकदा अगदी चार वाजायलाच येतोस .मग आजच काय जास्त ओझी उचलायची हौस आली वाटतं !
तो: अगं, ते सर्व मूडवर असतं .अंगात रग भरली,थकवा भरून आला की परत फिरायचं .कामाचा हुरूप असला ,थांबायचं .मग,तेवढाच एखादा रुपया ज्यादा मिळतो .(पिशवी आत ठेवतो.)
ती: अशानं आजारी पडलास म्हणजे ?
तो: (सहजच)तू आहेसच कि मग !
(तिच्या चेहऱ्यावर मृदू भाव चमकतात .)
ती: (लटकेपणाने) हं ,तू मस्त आजारी पडशील .मी काय तुझी बायको नाही,तुझी उस्त-पास्त करायला !
तो: हो,तेही खरंच ,पण एक मात्र तू नाकारू शकणार नाहीस .अगं इतक्या महिन्यात आज पहील्यांदा तू माझी वाट पाहत होतीस.आणि उशीर झाल्याबद्दल चक्क चिडलीस सुद्धा !
ती: मी कोण चिडणार तुझ्यावर ? स्टेशनवर लोकांची ओझी वाहतोस म्हणून आपलं काळजी वाटली .शेजारधर्म आहे हा .
तो: अस्स होय,मला वाटलं .(ती डोळे वाटारते ,तो हसून विषय बदलता -).मला उशीर व्हायचं एक खास कारण होतं .ओळख बघू .
ती: आता मला काय माहिती? बहुधा तुझी ती पहिली नखरेल बायको भेटली असेल .
तो: जी मला पार उधवस्त करून गेली ती मला कशाला भेटेल ?म्हणे पहिली बायको ,जशी काही मी दुसरी बायको केलीय !
ती: हं ,मोठ्ठा आलाय दुसरी बायको करणारा .
तो: ऐ ,आजतरी माझ्यावर असे चाबकासारखे शब्द चालवू नको .आज माझा ‘बर्थ डे’ आहे.
ती: (एकदम) अय्या ‘बर्थ डे’?
तो: हो,म्हणूनतर आज तुझ्याबरोबर काही चटपटीत खायचा बेत केला व थोडं ज्यादा काम केलं .मस्त केक स्लाईस आणि नुडल्स ,सामोसे ,गरमागरम ,खाणार लगेच ?
ती: नको,सावकाश खाऊया .प्रथम तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा .बोल,तुला वाढदिवसाची काय गिफ्ट देऊ?
तो: तुझ्या बापाच्या मालकीचा तो मोटारीचा कारखाना मला देऊन टाक .(ती पदर खोचून काकणे मागे सारते !तो कान पकडतो .)सॉरी अगं ,नसलेला कारखाना मी मागितला तर मोठेपणान ‘चल दिला’ म्हणायला काय जातंय ?
ती: (खेदाने)तसं ,,माझ्याकडे आहेच काय म्हण,तुला द्यायला ?
तो: कसली गिफ्ट घेऊन बसलीस ! तू अशीच मायेनं भांडत राहा,बस्स ,
ती: ऐ ..माझा राग नाही नां आला तुला ?
तो: तो कशाबद्दल ?उलट आपुलकीनं तू माझी वाट पाहिलीस.बरं वाटलं .पण तू काहीशी अस्वस्थ वाटतेस,तुझी तब्बेत ठीक आहे नां ?
ती: मी ठीक आहे. पण एक गोष्ट तुझ्या अजून लक्ष्यात आलेली नाही असं वाटतंय.त्यामुळे थोडी-
तो: कोणती ते सांग नां .
ती: गेले दोन-तीन दिवस इथली वर्दळ वाढलीय.
तो: ते तर रोजचच आहे.त्या गर्दीतून सुटकेसाठी लोकांना तात्पुरत्या निवांत ठिकाणाची ओढ असतेच.
ती: अरे,फिरायला येणारे लगेच लक्ष्यात येतात .हे लोक हातवारे करीत काही चर्चा करतात .त्यांचा काहीतरी प्लॅन चालला आहे .
तो: तिकडे नंतर वसलेल्या काही झोपड्या तोडायची कारवाई सुरु आहे .बहुधा तिथे बेघर होणाऱ्यांना इकडं पिटाळणार असतील.
ती: चांगली सुटाबुटात असतात .जागोजागी कसलं मोजमाप सुद्धा करतात.आपण बाहेर असतांना परवा कोण टी.व्ही.वालेसुध्दा येऊन गेले म्हणतात .
तो: सर्वे करणारी लोकं म्हणावं तर ती चार एक महिन्यापूर्वी आली होती .मग कोण असतील ?
ती: मला वाटतं कसला तरी बांधकाम प्लॅन चाललाय.
तो: बांधकाम?(हसतो)अगं ,घागरभर पाण्यासाठी त्या मैलभर कोळीवाडयावर जावं लागतंय ,आणि या लाटांच्या तोंडावर कशाला करतील बांधकाम ?
ती: तू काही म्हण,मला जरा हे सगळं वेगळंच वाटतंय .
(तेवढ्यात समाजसेवक प्र.क.त्याच्या हातात पेपर आहे .)
स.से.: नमस्कार ,बरं झालं ,दोघेही भेटलात.
तो: तुम्ही पुन्हा ?
स.से.: हो,अगदी खास तुमच्यासाठीच आलोय .तुम्हाला हे दाखवायचं होतं(पेपर उघडतो)हा पहा ,दोन दिवसापूर्वी तुमच्यावर खास लेख छापून आलाय .
तो: (दचकून)आमच्यावर ?
स.से.: म्हणजे तुमच्या या छोट्याश्या वसाहतीवर ‘जगावेगळं जग’हा मी खास लिहिलेला लेख .
(तो क्षणभर त्यावर नजर फिरवतो)
तो: पण-तुम्ही हे कशाला लिहिलंत ?
स.से.: कशाला म्हणजे ? शेवटी माणसंच आहात तुम्ही .वादळी लाटांनी उधवस्त केलेलं जीवन दुरुस्त करण्यासाठी सरकारला करोडो रुपये खर्च करावे लागतात . पण त्यामध्ये एकदा तुमच्यासारख्या गरीबांचा जीव गेला तर तो पैसा घेऊन काय करायचं ? म्हणुन प्रशासनाला चांगला जाब विचारलाय मी .
तो: तरीच गेले दोन दिवस इथली वर्दळ वाढलीय !
स.से.: (उत्साहाने) पाहिलंत ,लेखणीत केवढी ताकद असते ? अगदी रातोरात तुमची ही वसाहत ‘स्टार ’झालीय,चॅनेलवर एक ब्रेकिंग न्यूज झालीय.आज अधिकारी येताहेत,उद्या मंत्री आणि परवा मुख्यमंत्रीसुद्धा इथे आले तर आश्चर्य वाटायला नको .
ती: उगीच कुणाच्या एक-दोनात नको म्हणून आम्ही झगमगाटातून दूर या वादळ-वाऱ्यात निवारा शोधला .आता ते सुद्धा तुम्ही जगापुढे उघडं केलं . आता काय म्हणावं .
तो: (नाराजीने )साहेब ,हे बरं झालं नाही .
स.से.: अहो,मी तुमच्या काळजीपोटीच लिहिलंय .तुम्हाला कां काळजी वाटते ?सर्व काही ठीकच होईल .मी जर पलीकडे बाकीच्या लोकांशी चर्चा करून येतो .
(समाजसेवक वर्तमानपत्र घेऊन जातो .ते दोघे चिंतातूर .)
ती: मी तुला मघाशी हेच सांगत होते .त्या सोशलवर्करनं चांगला घोळच करून ठेवला .
तो: तू आता त्याचा विचार करू नकोस .आपण आयुष्यात जे वादळ सोसलंय त्यापेक्षा रौद्र काही असूच शकणार नाही .तू जरा आत जाऊन विश्रांती घे .
(ती आपल्या पाईपमध्ये जाते तोच एक अधिकारी लांबूनच ओरडतो .)
अधिकारी : कोण आहे रे तिकडे ?
तो: म-मी आहे .
अधिकारी : (पुढे येतो .) इथे काय करतो आहेस ?
तो: काय म्हणजे ? राहतोय इथे .(ती पाईपमध्ये सावधपणे ऐकत बसते .)
अधिकारी : (दटावतो)राहतोस ?ही काय कॉलनी आहे की अपार्टमेंट ?
तो: आमच्यासारख्या गरिबाला ही पाईपच अपार्टमेंट आहे साहेब .
अधिकारी : वर तोंड करून सांगतोस ! ही काय तुझ्या बापाची पाईप आहे ?
तो: कोणाच्या बापाची कुठली साहेब, मायबाप सरकारची .
अधिकारी : म्हणजे, माझ्याही बापाची नाही असं ..म्हणायचं तुला !
तो: तसं नाही हो, आम्ही बेघर ,शहराबाहेर रिकाम्या पडलेल्या या पाईपांचा निवारा केलाय झालं .
अधिकारी : अरे भविष्यात व्हावयाच्या ड्रेनेज लाईनसाठी त्या पाईप्स इथे आणून ठेवल्या आहेत, तुमच्या निवाऱ्यासाठी नाही. या एकेक पाईपची किंमत किती आहे माहिती आहे ?
तो: (निमूटपणे) नाही साहेब .
अधिकारी : (कटूपणे) नसणारच. त्याला डोकं हवं .जंगली जनावरात आणि तुमच्यात फक्त पायांचाच काय तो फरक .तिकडे शहरात राहणाऱ्या लोकांना नाना प्रकारचे कर भरावे लागतात .आणि तुम्ही मात्र इकडे सरकारी मालमत्तेचा फुकट उपभोग घेताय ?
तो: आम्ही नशीब फाटलेली माणसं कसला उपभोग घेणार हो ?
अधिकारी : नशीब फाटलेली की सरकारचा खिसा फाडणारी ?राहताय ती जागा ,कार्पोरेशनचा पाईप ,इथेपर्यंत येणाऱ्या स्ट्रीटलाईट ,हे काय फुकट आहे? तुम्हा लोकांना सैल सोडून चालणार नाही .(ब्रीफकेसमधून बुकपॅड काढतो-)मी नोटीस करून आणलेली आहे ,तुझं नांव सांग .
तो: प-पण कशाला साहेब ?
अधिकारी : मुकाट्याने नांव सांग ? विना परवानगी सरकारी मालमत्तेचा गैरवापर केल्याबद्दल हि नोटीस आहे . नाहीतर मग एखादी फाळा किंवा कराची पावती दाखव.नाही नां –मग नांव सांग .
तो: यशवंत साहेब .
अधिकारी : (आश्चर्याने) यशवंतसाहेब ?
तो: तसं नव्हे –फक्त यशवंत .यशवंत कुबेर .
अधिकारी : (उपरोधाने) कुबेर ? अरे व्वा ,धन्य आहात .
(अधिकारी पावतीवर नाव लिहून कागद त्याच्या हाती देतो.)
अधिकारी : वाचता येत असेल तर वाच.नाहीतर कोणाकडून तरी निट वाचून घे .त्या दुसरया पाईपमध्ये कोण आहे ?
तो: एक बाई आहे .
अधिकारी : बाई ? छान.सगळी सोय दिसते तुझी ! बोलाव तिला बाहेर .
ती: (करवादते आतूनच ) येत नाही बाहेर .
अधिकारी : येत नाही ?बरी गुर्मी दिसते तिला !ओढून बाहेर काढली म्हणजे समजेल .
ती: मग दम असला तर पुढे ये .बायकांच्या अंगाला हात लावायचं लायसेन्स दिलंय होय सरकारनं तुला ?
अधिकारी :(नरमतो) मग जरा बाईच्या पायरीनं वाग. नावं सांग तुझं .
ती: (तिडकीने)नाही सांगत जा-अरे तिकडे जागा न जागा खुशाल बळकावल्यात धनदांडग्यांनी,अगोदर त्यांना नोटीस दे जा .चिरीमिरीसाठी कुत्र्यावानी शेपूट हलवतोस त्यांच्यापुढे .
अधिकारी: (दबक्या आवाजात ,त्याला )ये,ती बाई जरा सर्किट आहे काय? नोटीस नाही स्विकारली तर मला पोलीस केस करावी लागेल .
तो: साहेब, मी सांगतो .तिचं नाव शकू ...
ती: (आतूनच) ऐ ,तू सांगू नको .करू दे तो पोलीस केस .
(तेवढ्यात समाजसेवक पुन्हा प्रवेश करतो .)
स.से: इकडे कसली आरडओरड चाललीय ! आपण कोण ?
अधिकारी: मी महापालिकेचा विकास अधिकारी नागेश तिरपुडे .
स.से: नमस्कार .मी या प्रभागातील सोशलवर्कर प्रल्हाद पाटणकर .
अधिकारी : हं ,म्हणजे परवा तो ‘जगावेगळं जग’नावाचा लेख आपणच लिहिलाय वाटतं .छान लेख .
स.से: (खुलतो)हो.बघा त्यामुळे तुमची सगळी यंत्रणा कशी अगदी खडबडून जागी झाली,नाही का ?
अधिकारी : काय राव , आम्ही काय झोपा काढतो असं वाटतं की काय तुम्हाला ?अहो ,ऐवढया मोठ्या महानगरात कुठं काय चाललंय हे लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागतोच .
स.से.: असू दे .उशिरा का असेना यंत्रणा काम करणार हे, काय कमी नाही .
अधिकारी : अहो,करावेच लागणार.अगदी वरून कडक आदेश आलेत .म्हणून तर दुय्यम अधिकारी न पाठवता मी स्वतः आलोय .
स.से.: फारच छान .असे जागरूक ,तत्पर अधिकारी जरा दुर्मिळच .बऱं ,साधारण काय विकास योजना आहे या लोकांसाठी ?
अधिकारी : (गोंधळतो)विकास योजना ?
तो: अहो,सोशलवर्कर ,त्यांना भलतंच काय विचारताय ?ते आमची विकास योजना नव्हे ,आम्हाला येथून हुसकून लावण्याची योजना घेऊन आलेत .आम्ही म्हणे सरकारी मालमत्तेचा गैरवापर केलाय.हे पहा नोटीस .
स.से.: (धक्का बसून) नोटीस ?( त्याच्या हातातील नोटीस घेतो व मोठ्याने वाचतो) नियोजित शासकीय विश्रामधामच्या आरक्षित जागेवर ड्रेनेज लाईनसाठी ठेवलेल्या पाईपचा आपण निवासासाठी बेकायदेशीररित्या वापर केलेला आहे .सबब,हि नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात आपण ही जागा खाली करावी . अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करून ही जागा ताब्यात घेतली जाईल व आपल्यास दंडित केले जाईल .(कपाळाला हात लावून)हे काय ?
अधिकारी: तेच तर तुम्हाला सांगत होतो .
स.से.: म्हणजे यांच पुनर्वसन करण्याऐवजी पुन्हा विस्थापित करून टाकणे हा तुमचा विकास कार्यक्रम !
अधिकारी: अर्थातच .तुम्ही लिहिलं ते एका अर्थी बराच झालं समजा ,तुम्ही शक्यता व्यक्त केल्याप्रमाणे उद्या त्सुनामी लाटेत जर हि माणसं मेलीत तर आमच्या नोकर्या जातीलच वर यांच्या मरणानं सरकारची नाचक्की व्हायची .
स.से.: गरीब जातो जीवानिशी आणि तुम्ही सरकारच्या नाचक्कीची बात करता !त्यांना जागवता येत नसेल तर किमान मारू तरी नका .
अधिकारी: तुम्ही म्हणता तेवढं सोपं आहे कां पुनर्वसन ?अहो, तिकडे पक्क्या घरावरही आम्ही डोझर चालवतोय ,येथे तसं तर नाही !याजागी शासकीय विश्रामधामचं काम लवकरच सुरु होणार आहे .
स.से.: व्वा! त्सुनामीच्या लाटेची भिती लोकांना सांगताय मग अशा ठिकाणी विश्रामधाम तरी कशासाठी ?
अधिकारी: तो माझा अधिकाराचा भाग नाही .
स.से.: या गरिबांनी जायचं कुठे ? एवढ्या सहज आम्ही हे होऊ देणार नाही .आम्हाला आंदोलने करावी लागतील.
अधिकारी: या गोष्टी आम्हाला नवीन नाहीत.तुम्ही ऊगीच चुकीच्या लोकांची साथ देऊ नका .बऱ,मला अजून बाकीच्या लोकांना नोटीस द्यायची आहे .(त्याला-)ऐ ,त्या बाईचं पूर्ण नाव सांग .(ती त्वेषाने पाईपमधून बाहेर येते .)
ती: काय रे फुकणीच्या,माझं नाव पाहिजे नं तुला ?लिही आता .
अधिकारी: (गडबडतो) त-तू ?
ती: हो, मीच. माझ्या आयुष्याची राखरांगोळी करूनही अजून माझ्या राशीला आहेसच ?आता माझ्या नावाबरोबर तुझंही नाव लिहिणार आहेस? आहे तेवढी हिम्मत ?
अधिकारी: ऊगीच वाट्टेल ते बरळू नकोस.तुझा माझा काहीएक संबंध राहिलेला नाहीय. ज्यादिवशी मी तुला घरातून-
ती: (मध्येच)अरे थुंकते तुझ्या त्या घरावर.कोणत्या कोर्टात तू मला सोडचिठठी दिलीस ते सांग.तुला बघायचाय माझा हिसका?(अधिकारी कागदावर तिचे नाव लिहितो व तिच्या अंगावर फेकतो )
अधिकारी: तुला काय करायचं ते कर.कोर्टाची धमकी मला देऊ नको .तुला बदफैली सिद्ध करायला मला वेळ लागणार नाही.(ती त्याला मारायला धावणार असते पण तो अडवतो .अधिकारी निघून जातो.ती त्याने टाकलेला कागद घेते व रागाने फाडून तुकडे करून टाकते .)
ती: (संतापाने)मलाच बदफैली म्हणतो ,निर्लज्ज माणूस !
तो: सोशलवर्कर,बघितलंत?आम्ही समाजालाच काय त्या सरकारलाही ओझं वाटतोय.तुमच्या सहानुभूतीची केवढी मोठी शिक्षा आम्हाला भोगावी लागणार
स.से: लगेच असे निराश होऊ नका.ही काही कोर्ट ऑर्डर नाही .
ती: कां म्हणून आमच्यावर लिहीलस बाबा! आता तो सैतान मला नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही .
स.से: बाई,तुमचं कायदेशीर सोडपत्र झालेलं नसताना तुम्ही गप्प कां बसता ? तुम्हीच त्याला धडा शिकवू शकता त्याच्यावर पोटगीचा दावा ठोकून .
ती: त्याची हरामाची पोटगी खाण्यापेक्षा विष खाईन मी.ज्या दिवशी त्याने मला घराबाहेर काढली त्यादिवशी मेला मला तो .
तो: सोशलवर्कर , माझी अखेरची विनंती आहे तुम्हाला.इतके महिने या सागराच्या शेजारी राहिलो पण त्याच्या त्या रौद्र लाटांनीही आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न कधी केलं नाही.ती सागरी त्सुनामी राहिली बाजूलाच,तुमच्या त्या लेखामुळे ही सरकारी त्सुनामी आता आमच्यावर आलीय .
कृपा करून आता तरी आम्हाला सोडा.(हात जोडतो .)
स.से: (निराशेने)जशी तुमची मर्जी .
(समाजसेवक निघून जातो.तो मधील उंचवटयावर डोक्याला हात लावून बसतो.ती त्याच्याजवळ जाते व खांद्यावर हात ठेवते. )
ती: मला माफ कर हे सगळं माझ्यामुळे झालंय.एक दिवस,जीवन संपविण्यासाठी मी या ठिकाणी आले,पण तू मला नवं बळ दिलंस.आज तूच डोक्याला हात लावून बसलास?पण-मी म्हणते,होऊन होऊन काय होईल? फारतर येथून आपल्याला हाकलून लावतील.पण-जग किती विशाल आहे ! कुठंतरी असा एखादा कोनाडा असेलच,जिथे तू आणि मी एकत्र ....
(तो चमकून तिच्याकडे पाहतो .ती भावूकपणे पाहते.)
तो: हे तू म्हणतेस?
ती: त्यशिवाय या सरकारी त्सुनामीतून उभं राहता येईल का?आटप ...अंधारुन आलंय .मी मेणबत्ती लावते. तुझा वाढदिवस साजरा करूया .
(तो उमेदीने उठून उभा राहतो .)
टिप्पणी पोस्ट करा