गुढीपाडवा

    गुढीपाडव्या ची माहिती व इतिहास 

 चैत्र शुद्ध अश्विन प्रतिपदेला येणारा सण म्हणजे गुढीपाडवा.आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. कारण गुढीपाडवा हा हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र सण मानला जातो. यातील गुढीपाडवा, दसरा, अक्षयतृतिया हे पूर्ण मुहूर्त मानले तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो . 
    म्हणून गुढीपाडवा हा भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.तसेच शालिवाहन संवत्सराला सुरुवात हि या दिवसापासूनच होते. या शालिवाहन संवत्सराला सुरुवात केव्हा झाली त्याबद्दल एक आख्यायिका आहे. असे म्हणतात कि शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता त्याने शकांना पराभूत करण्यसाठी शक्कल लढवली ती अशी कि मानवी आकाराचे सहा हजार मातीचे पुतळे बनवून त्यामध्ये जीव ओतला प्राण घातले आणि त्यांना लढवून शकांचा पराभव केला. हाच तो शालिवाहन राजा ज्याच्या नावाने शालिवाहन संवत्सराचा प्रारंभ झाला. हे संवत्सर मराठी महिन्याच्या चैत्र महिन्यात येत असल्यामुळे हिंदू धर्मीय लोक नववर्षांची सुरुवात या दिवशी करतात . हा दिवस इतका उत्तम असतो कि या दिवशी कुठल्याही कार्याची सुरुवात केली कि ते कार्य संपूर्ण सार्थकी लागते असे मानतात. त्यामुळे या दिवशी मुहूर्त चांगलाच असतो तो कोणत्याही पंचांगात पाहण्याची गरज नसते इतका हा दिवस शुभ असतो. अशा या शुभ मुहूर्तावर नवीन घराची,दुकानाची वास्तुशांती, गृहप्रवेश,सोने खरेदी व नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते . या दिवसाचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी ब्रम्हाने या सर्व जगताची निर्मिती केली .श्री प्रभू रामचंद्र यांनी पूर्ण चौदा वर्षे वनवास भोगला त्यामध्ये त्यानी रावणाचा पराभव केला व ज्यादिवशी ते वनवास पूर्ण करून आपल्या अयोध्या नगरीत प्रथम आले त्यादिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या,तोरणे उभारली तो दिवसही हाच होता . हा सण इतरही राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो जसे कि आंध्रप्रदेश, कर्नाटक मध्ये उगादी,चांद आणि चेटी,कोकणामध्ये सौसार पाडवो, इत्यादी.. अशाप्रकारे या सणाचे फक्त पौराणिक महात्म आहे असे नाही त्याला सामाजिक तसेच नैसर्गिक स्तरावरही महत्व आहे. त्याबद्दल आपण सविस्तर खालील लेखात पाहू.

गुढीपाडवा हा पवित्र सन अत्यंत आनंदाने साजरा केला जातो कारण त्याला अध्यात्मिक ,सामाजिक,तसेच नैसर्गिक महत्व आहे .तर अशा या पवित्र दिवशी घरातील सर्वजण लवकर उठतात. आपापली आन्हिके आवरून नवीन कपडे परिधान करतात. घरातील सर्व स्त्रिया अंगणातील जागा पाण्याने स्वच्छ करतात . अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढतात. पुरुष मंडळी गुढी उभी करण्याच्या तयारीला लागतात .एक उभी सरळ लांब अशी बांबूची काठी घेऊन ती गरम पाण्याने धुवून एका कापडाने पुसून स्वच्छ करून घेतात. या गुढीच्या टोकाशी नवीन वस्त्र उदा. रुमाल, तलम कापडाचे रंगीत वस्त्र ,साडी देखील बांधली जाते. त्यावर तांब्याचा लोटा/चंबू/कलश उलटा लावतात. त्याला कडूनिंबाची पाने, गोडासाठी साखरेची रंगीत माळ, झेंडूच्या फुलांची माळ ,उपलब्धतेनुसार आंब्याचे तोरण थोड्या थोड्या अंतरावर गुढीला बांधतात. अशी हि गुढी एका पाटावर उभी केली जाते .अशी हि गुढी हि शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक तसेच समृद्धीचे, सकारात्मक दृष्टिकोणाचे प्रतिक मानले जाते. सध्या बाजारामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेल्या तयार लहान गुढ्या विकत मिळतात बरेच कॉलनी,फ्ल्यॅट मध्ये राहणारी लोक जागेच्या अभावामुळे अशा गुढ्या विकत आणून आपल्या गॅलरीत उभारतात. या गुढीभोवती सुंदर रांगोळी काढून फुलांनी ती सजवतात. गुढीला हळदी कुंकू लावून आरती ओवाळून त्याचे पूजन करतात.निरंजन लावून उदबत्ती ओवाळून स्त्रिया ओैक्षवन करतात. अशा या गुढीभोवती घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन भक्तिभावे पूजन करतात. अशा मंगलमय वातावरणात सर्वांचे चेहरे हर्षोल्हासाने न्हाऊन निघाले असतात. त्यानंतर घरातील ज्येष्ट व्यक्ती कडूनिंबाची पाने,गुळ,हिंग,ओवा एकत्र करून त्याची लहान गोळी बनवतात मला आठवते आमच्या लहानपणी आमची आजी अशी गोळी बनवून सर्वाना खायला द्यायची. आम्हाला ती आवडायची नाही पण आजी दरडावून ती आम्हाला खायला लावायची. पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचे शास्त्रीय महत्व आम्हाला आज माहित झाले आहे ते असे कि कडूनिंब सेवन केल्याने पचन सुधारते, पित्ताचा त्रास होत नाही, आरोग्यास लाभदायक आहे . कडूनिंबाची पाने घातलेले पाणी अंगावर घेऊन अंघोळ केल्याने त्वचेला लाभ होतो. अशाप्रकारे या सणाधून मानवाच्या आरोग्यास फायदाच होतो. चैत्र महिन्यात आणखी एक पर्यावरणीय बदल आपल्याला पहावयास मिळतो तो म्हणजे शिशिर ऋुतू असल्यामुळे सृष्टीतील झाडांची पानगळती होऊन त्यांना एक नवीन पालवी फुटते तोही एक नवचैतन्याचा सोहळाच निसर्गामध्ये साजरा होत असतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

प्रत्येक घरामध्ये या दिवशी गोडधोडाचा बहुदा पुरणपोळीचा बेत असतो. स्त्रिया स्वयपाकात पंचपक्वाने बनवून तो नैवेद्य प्रथम गुढीला दाखवतात. त्यानंतरच घरातील सर्व लहान थोर सर्वजण एकत्र भोजन करतात.यातून परिवारामध्ये आपुलकीची भावना वाढीस लागते. 

संध्याकाळी सूर्यास्त होण्या अगोदर गुढी उतरवली जाते त्यापूर्वी गुढीला उदबत्ती ओवाळून साखरेचा नेवेद्य दाखवतात .गुढी उतरवल्या नंतर त्यावरील सर्व माळा काढून , तांब्याचा /कलश चंबू काढून ठेवतात. त्यानंतर बात्ताशाची/साखरेची माळ सोडून सर्वाना साखर प्रसाद म्हणून वाटला जातो.

असा हा गुढीपाडवा सण सर्वजण मोठ्या आनंदाने,मंगलमय वातावरणात साजरा करतात. सध्या गुढीपाडव्या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक जसे कि गुढीपाडवा पहाटसंगीत सारखे कार्यक्रम आयोजीत  केले जातात.  

या लेखामध्ये आम्ही गुढीपाडव्याचा इतिहास, त्याचे अध्यात्मिक, नैसर्गिक,सामाजिक महत्व , गुढी कशी सजवावी ,उभारावी ,पूजा कशी करावी या सर्व बाबींचा माहितीप्रमाणे समावेश केला आहे .मी अशी अशा करतो कि गुढीपाडवा हा लेख विद्यार्थ्यांना शाळेत निबंध,गृहपाठ करणेसाठी मदत करेल तसेच सर्वाना सणाची माहितीही या लेखातून मिळेल. हिंदू सणाबद्दल माहिती देण्याचा हा आमचा छोटा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल. 

लेखक - कमलेश पाडळकर 






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने