चिमुकली
आज पहाटे ५ च्या सुमाराला फोन ची रिंग वाजली ..२ तास नसतील झाले झोपून तेवढ्यात फोन आला .डोळे चोळत मी फोन कानाला लावला पलीकडून आवाज आला 'सर मी बाईत सिस्टर बोलते निवळी-प्रचितगड वरून '...
![]() |
Image Source - Google | Image by - pikrepo.com |
मी म्हटलं ' बोला ... इथे एक डिलिव्हरी ची पेशन्ट आहे ...आणि संगमेश्वर ला दवाखान्यात यायचं आहे पण इकडे रस्ते खराब आहेत आणि वाहनांची व्यवस्था नाहीय ..' मी म्हटलं ' ठीक आहे ...तुम्ही तपासणी केली का ..? तिकडून आवाज आला ' हो थोड्यावेळात तिची डिलिव्हरी होईल 'बापरे ..निवळी-प्रचितगड ला पोहोचायचं म्हणजे एक ते दीड तास लागेल ...तसाच आमचा ड्रायव्हर गणेश दादा ला आवाज दिला अन गाडी काढायला लावली ...
![]() |
Image Source - Google | Image by - wallpapersafari.com |
पहाटे च्या धुक्यातून वाट काढत ..गाडी निवळी-प्रचितगड च्या दिशेने धावू लागली ...दाट धुक्यातून वाट काढत गाडी पळवण म्हणजे दिव्यच ...त्यात प्रचंड झाडी ...भरपूर खड्डे असलेला रस्ता ...दिवसाचा गोंडा फुटायचा अवकाश होता ...पूर्वेला आभाळात लाली आली होती ... झाडांवर पाखरांची गडबड चालू होती ... शृंगारपूरच्या अलीकडे असताना परत बाईत सिस्टर चा फोन आला ...' सर डिलिव्हरी होतेय मी करते पण तुम्ही लगेच या ' मी हो असं म्हणून फोन ठेवला आणि गणेश दादा ला गाडी ची स्पीड वाढवायला सांगितलं ...गाडीनं एक वळण घेतलं आणि निवळीच्या घाटातुन वर जायला लागली ...पूर्वेला सूर्य उगवला होता त्याची तिरपी किरणं ..पडली होती ..त्यामुळं स्वच्छ दिसत होतं ...आणि काही वेळातच आम्ही निवळी-प्रचितगड ला पोहोचलो ..
![]() |
Image Source - Google | Image by - lyer-wikipedia |
कौलाच्या घरासमोर पोहोचलो ...तसं सिस्टर आल्या न त्यांनी डिलिव्हरी झाल्याचं सांगितलं ...मी स्टेथोस्कोप घेऊन घरात गेलो तर एक म्हातारी बसली होती बाळाच्या जवळ ...मला आश्चर्य वाटलं ..'बाळाची आई कुठाय ..? '
तसं म्हातारी म्हटली " ती सोप्यात बसली तीच आईस हाय.." मला समजेना हि आई बाळापासून लांब जाऊन का बसलीय .. मी बाळाची तपासणी केली ..बाळाने गर्भ जल गिळले असल्याने छातीत घरघर होती .. लगेच गर्भ जल नळी टाकून काढून टाकले ... अन बाळाच्या आईला बघायला गेलो ..अगदी व्यवस्थित होती ... मी म्हटलं " आजी बाळाला सुती कापड्यामध्ये गुंडाळून घे " म्हातारी म्हणजे एकदम जख्खड होती .. सुती कापड घेतलं अन त्यावर बाळाला ठेऊन गुंडाळायला सुरवात केली अगदी तिरस्काराने ..ते जाणवत होतं ... मी म्हटलं चला आपण संगमेश्वर च्या दवाखान्यात घेऊन जाऊ ..तसं बाळाचा बाप बोलला " अन आम्ही परत येऊ कसं..?"
मी म्हटलं ..तुम्हाला घरी येण्यासाठी सुध्धा गाडी भेटेल ...!" तसं सगळे एक सुरात म्हटले "नाही जायचं आम्हाला दवाखान्यात ..!"
म्हटलं काय विचित्रपणा आहे नेण्यासाठी परत येण्यासाठी मोफत गाडी भेटत असून सुद्धा तयार नाहीत ..
त्याच वेळी म्हातारीने बाळाच्या पायावर फटके मारत बोलू लागली " पोर पाहिजे होता हि पोरगी झाली .. " अन त्याक्षणी माझ्या लक्षात आलं ..मुलगी झाली म्हणून बाळाची आई सोप्यात जाऊन बसली ..म्हातारी तिरस्काराने बडबडत होती ...!
मला खूपच राग आला मी म्हटलं " ए आज्जी काय करते ग ..इतक्या लहान जीवाला मारताना काहीच नाही वाटत का ..? आणि कशाला पाहिजे पोरगा ..?" तसं म्हातारी म्हणते .." मग याला पाठीवर भाऊ नको का ..." असं म्हणत 3 वर्षाच्या मुलाकडे हात दाखवला ...! मग तर मला रागच अनावर झाला ..मी म्हटलं .." म्हणजे पहिला मुलगा आहे तरी तुम्ही इतका तिरस्कार करता ..? असे काय झेंडे लावणार आहे पोरगा ..? आणि तुझ्या मुलाने असें काय दिवे लावले ग ...? स्वतः एक स्त्री आहे ..तरी इतका तिरस्कार ...? अन त्या चिमुकलीचा काय गुन्हा आहे गं ..?
त्या चिमुकलीने काही मिनीट झाली असतील श्वास घेऊन ...न तिच्या नशिबी हे ...?
बाळाच्या आई न म्हातारीला म्हटलं .." जेव्हा तूम्ही जन्माला आल्या तेव्हा जर तुमच्या आईने टाकलं असतं तर ..? तुम्ही कसं काय विसरू शकता आपण पण स्त्री आहोत ..? अन तू बाळाची आई " आपल्या पोटचं लेकरू टाकून बाहेर जायला काहीच नाही वाटत ..?
त्याच ठिकाणी बाळाचा बाप बोलला " ओ डॉक्टर तुम्हाला नाही माहित ....जीवन कसं असतंय ...मुलींना सांभाळायचं म्हणजे सोप्पी गोष्ट नाही ..."
मी म्हटलं बरोबर आहे यात तुमची चुकी नाही ..जे पेरलंय तेच उगवलंय ...!
मी खूप समजावून सांगून सुद्धा त्यांनी दवाखान्यात येण्यासाठी नकार दिला ... मी माझ्या परीने प्रयत्न केले ...पण ते निष्फळ ठरले ...!
एकदा त्या चिमुकली कडे नजर टाकली .... इवल्याश्या हातांची न पायांची हालचाल करत शांत पहुडली होती ....
आम्ही हताश होऊन गाडी संगमेश्वर च्या दिशेने सुरु केली ..न माझ्या मनात विचारांनी घर करायला सुरुवात केली ...
त्या चिमुकलीचा दोष तो काय ..? जन्माला आली न तिच्या नशिबी हे भोग आलेत .. तिला जगण्याचा अधिकार नाही का ..?
आज आम्ही मुली कसं आकाश पादाक्रांत केल्याच्या गप्पा मारतो ...पण या चिमुकली सारख्या कित्येक कळ्या कोमेजून चालल्या आहेत ...
मुलगा च पाहिजे हा अट्टाहास का ...? किती मूलं आई बापाला टाकून देतात ...तरी सुद्धा ...हाच अट्टाहास ..?
अशा निर्दयी आई बापाला काय म्हणायचं ..? जे एका लहानग्या जीवाला जवळ पण नाही करू शकत ..!
यात दोष कुणाचा ..?
यात दोष त्या परमेश्वराचा ...." अरे ज्यांची लायकीच नाही त्या घरी का जन्माला घालतो मुलीला ...?"
आईबापाची इज्जत म्हणून सासुरवासात दिवस काढणाऱ्या मुली ...बापाला काही दुखलं तरी डोळ्यातून आसवांची नदी वाहते मुलींच्या ...आई बापाकडे बघून आपलं दुःख कधी हि चेहऱ्यावर न येऊ देत मी सुखात आहे असं बोलणारी मुलगी ...तरी ही का ....नको ...मुलगी ...?
परमेश्वरा त्या चिमुकलीला दहा हत्तीचं बळ दे हे सगळं सहन करायची शक्ती दे .... शृंगारपूरचे वळण सोडून गाडी आता पक्क्या रस्त्याला लागली होती ...सकाळचं कोवळ उन्हाची लाट संपून सूर्य आता आग ओकायला लागला होता ...आणि निशब्द आम्ही संगमेश्वर च्या दिशेने निघालो होतो...!
डॉ.शहाजी खरंच हे हृदयस्पर्शी कथा आहे. डोळ्यात पाणी आले माझ्या. हे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. Touching.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा