मुली जन्मालाच न घालणाऱ्या समाजाला की जीवनशैलीच बदलून टाकणाऱ्या व्यवस्थेला ?



Image Source - Google | Image by - letliveindia.com



तसं लग्न झालेल्या व्यक्तीनं  'न उडालेला बार ’ या विषयावर बोलणं बरं नव्हे . तरीपण जीव राहवेना म्हणुन हा उपद्व्याप करावासा वाटला .

तसा वयाच्या मानाने लग्नासंबधीचा माझा अनुभव जरा पोक्तपणाचा वाटेल पण लग्नाच्या बाजारात चांगलीच दमछाक झालेले अनेक जीव भेटतात आणि मग बोलता बोलता समाजासमोर उभ्या असणारया सर्वात ज्वलंत प्रश्नास वाचा फुटू लागते .

आता लग्नाचा उमेदवार म्हटलं की एक विशिष्ट मापदंड लावला जातो मग तो मुलगा असो व मुलगी .
आता अपेक्षा करायला मुलांकडे स्कोप नाही राहिला तो भाग वेगळा .

भौतिक सुखाच्या मागे लागलेले सारेच अपेक्षांची भली मोठी यादी बनवून लग्नाचा बाजारहाट करू लागतात ,त्यात ना स्वताची क्षमता बघितली जाते ना दुसरयाची ऐपत .दोष तरी कोणाला द्यायचा ? ज्याला लग्न करायचं आहे त्यालाच माहित नसतं की त्याला काय हवंय . मेंढराच्या कळपाप्रमाणे एकामागे एक जात राहतात .

मुलीसाठी मुलगा पाहताना मुली अगोदर मुलीच्या आईच्या अपेक्षांची यादी तयार असते . सरकारी नोकर , फ्लॅट, गाडी, बँक बलन्स, गावाकडे जमीन आणि पाठीमागे कोणी नसलेलेच बरे . ज्याच्या सोबत मुलीला आयुष्य काढायचं आहे तो मुलगा मग कसाही असला तरी चालतो हे सगळं असलं की त्याच्या वाईट सवयी लगेच एटिकेट्समध्ये बदलल्या जातात .उदा. सोशल ड्रिंकर, प्रोफेशनल स्मोकर , सोशल इत्यादी इत्यादी .

फक्त शेतजमीन नाही म्हणून अनेक सुशिक्षित मुलांची लग्न होत नाहीयेत ,बरं शेतजमीन म्हणावी तर शेतकरयानापण कोणी मुली देत नाही . मग नेमकं हवंय तरी काय मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना . सगळं कसं एकदम तयार हवं ,जिथल्या तिथे काय तर म्हणे मुलीला त्रास नको , अरे मुळात कष्टातला आनंदच विसरलीयेत हि माणसं. अलीकडे लोक एकत्र कुटुंबात मुलगी द्यायला तयार नाही होत . जास्ती नाती नको म्हणतात . आताशा मुलाचं लग्न होत नाही म्हणून झुरणारे आईबाप पहिले की जीव व्याकूळ होतो 
पण 
दोष कोणाला द्यावा ?
तथाकथित वंशाच्या दिव्यांसाठी लाखो निष्पाप कळया खुडणाऱ्याना ?
हे अशाच लोकांचे हे पाप आता हा समाज भोगतोय . मुलांनी तर लग्न होत नाही म्हणून बोभाटा का करावा ?
कोणता बाप आजमितीला छाती ठोकून सांगू शकतो की ,माझा मुलगा निर्व्यसनी निष्कलंक आहे .
ठेवलाय का तो अभिमान आपण आपल्या बापासाठी शिल्लक ? नाही ना ?
ओठावर मिसरूड फुटलं नसताना बापानं सोसायटी काढून गाडी घेऊन दिली . लाडाचं लेकरू म्हणून आईनं हात सैल सोडला त्याचा हा परिणाम .

लग्न जमत नाही हा शब्द आपण अनेकांच्या तोंडातून ऐकतो याचं कारण मुळात बदलत चाललेली जीवनशैली आहे असं मला वाटतं . पूर्वी एकत्र कुटुंबात पाहुण्यांची ओळखीने लग्न जमत असत, आता आपणही व्यवस्थाच उखडून टाकली आहे . आपण मात्र आता शहाणं व्हायला हवं .
मुळात लग्नाळू लोकांना समजायला हवे आपल्याला काय हवं आहे . बोलायला हवं . व्यक्त व्हायला हवं . सर्वात महत्वाचं स्वतःला सिद्ध करून दाखवायला हवं . घेतलेलं शिक्षण डिग्रीच्या रुपात भिंतीवर न टांगता ते आपल्या व्यक्तीमत्वात उतरवायला हवं . तर अनेक गोष्टी सुकर होतील. 

लेखन - डॉ . विवेक डोईजड 








2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने