ग्रीष्म पेटला पेटला 
थेंब आटला आटला 
रखरखत्या उन्हात
कंठ भुईचा दाटला 

Image Source - Google | Image by - India TV


धरती व्याकूळ तहानेनं 
अश्रुविना ती रडते 
पहाटे डोलणारी वेली 
दिवसा निपचित पडते 

ग्रीष्म तुझा हा उकाडा 
सृष्टीला सहावेना 
भेगाळल्या धरणी आईला 
पाण्याविना पाहवेना 

लाही लाही तुझी ग्रीष्मा 
पान फुलं हि भाजली 
झळा सोसाण्यापरीस 
पाखरं घरट्यात निजली 

ग्रीष्मा तुझ्या या दिसात 
यावी वळीवाची सर
जागा होईल रे तेव्हा 
झोपी गेलेला निर्झर 

ग्रीष्मा तुझ्या येण्यानं 
रुसतं नदीतलं पाणी 
कधी गारव्याला गाणारी 
विसरली कोकीळाही गाणी 

उन्हं सोसवेना ग्रीष्मा 
सख्या वळीवाला पाड 
मग पाहतील आनंदाने 
धरती पानं-फुलं झाड

आम्हा ठाव आहे ग्रीष्म 
काम तुझं तुला बरं 
हाती तुझ्या रे आहे 
सख्या वळीवाची सर ...

कवयित्री :-प्राजक्ता सुरेश परीट  






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने