आपुलकी


हा प्रसंग गेल्या वर्षीच्या एप्रिल मधील आहे. 

      मी तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र पावस ( रत्नागिरी) ला आपत्कालीन सेवेत नोकरीला होतो. शासकीय रुग्णालयात म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यादिवशी OPD मध्ये पेशन्ट बघत होतो. नेहमी प्रमाणे भरपूर गर्दी होती.... सकाळी नाष्टा केला नसल्याने प्रचंड भूक लागली होती. सगळे पेशन्ट झाले की जाऊन पावसच्या स्टँड वर जाऊन काही तरी खाऊ असा विचार करून भरभर पेशन्ट उरकण्याचा प्रयत्न करत होतो. मुळात मी कितीही ठरवलं लवकर पेशन्ट संपवायचे तरी संपत नाहीत याचं कारण एका एका पेशन्टला त्याचं समाधान होईपर्यंत वेळ देतो ... अर्थात ती सवय लागलीय ..... !

Pic by - Dr. Shahaji Mote-Patil

        एक ५० ते ५५ वय असलेल्या स्त्री पेशन्ट आल्या. माझ्या खुर्चीच्या शेजारी स्टूलवर बसायचा इशारा करत मी विचारलं , काय होतंय ??? 

त्या बोलल्या , माझं डोकं दुखत राहतं ... ४ दिवस झालं ताप निघत नाही..चक्कर पण येते ... मी BP तपासलं शुगर पण नॉर्मल होती ... म्हटलं अजून काय होतंय .... ? 

'काही नाही बावा हे दुखणं जल्लं रोच्च च हाय ....' 

        रुग्णाशी थोड्या गप्पा मारल्या विचारपूस केली की त्यांना बरं वाटतं ... म्हणून मी त्यांच्याबद्दल जुजबी माहिती विचारत असतो . म्हणून मी विचारलं , मावशी एकटीच आलीस ??? सोबत कोण नाही आलं ???? चक्कर येते ना ??? 

त्यावर , ती गंभीर झाली डोळ्याला पदर लावून रडत रडत सांगायला सुरुवात केली ..... काय सांगायचं बावा कोण नाही माझं .... नवरा आधीच गेला त्याला झाली असतील पंधरा एक वर्ष ..... पोरगा होता एकुलता एक .... तुझ्याएव्हढाच ..... अगदी तुझ्यासारखाच .... पण त्या रंडक्या देवाला नाही बघवलं .....६ वर्ष झाली ... गाडीवरून पडला डोक्याला लागलं.. रक्ताचा पाट नुसता..... सगळं दवाखाने पालथे घातले .... रत्नागिरी ला घेऊन गेली .... मला काय समजतंय मोठ्या गावात गेलं की ...? आम्ही डोंगरात रहाणारी माणसं... जास्तीतजास्त पावस पर्यंत म्हायीत .... घरात आहे नाही तेवढं सगळं विकलं ... पोराला वाचवायला .... पण नाही ..... गेला पोर माझा ....

     कशीबशी काम करते .... अन जगते रोज ....कधी पैसे असतात कधी नसतात ....न्हवते आज म्हणून चालत आले बघ ......बरं वाटत न्हवतं म्हणून कामाला नाही गेली ....आणि कामाला नाही त्यामुळं हातात दमडी पण नाही ....  आज माझा पोर असता तर तुझ्याएव्हढा असता.... दुखलं खुपलं तर कोण चहा तरी घे म्हणणारं आपलं माणूस असावं ....मला तुझ्याकडं बघितलं अन माझ्या पोराची आठवण आली बघ ..... 

      अश्या स्थितीत मी काय बोलावं हेच मला कळत न्हवतं ..... ती अशी बोलत होती जणू कित्येक दिवसाचं दुःख आपल्या लेकराला सांगतेय .... मला पण वाईट वाटलं .... ती आजारी होती चक्कर येत असताना कित्येक किलोमीटर डोंगर दऱ्यातून चालत आली होती ....या प्रसंगात नक्की मी काय समजावणार ???? तिचं दुःख तिलाच माहीत. पेपरवर गोळ्या औषध लिहून दिली.... खिशातून ५० रुपये काढले अन तिच्या हातावर ठेवले .... अन म्हटलं , जाताना गाडीने जा ....हातात पैसे बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं... नको म्हणत होती .... मी तिच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं तुझा पोरगा असता तर त्याला नको म्हटली असती का ???? मला पण पोरगा समज ....तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती....ती बोलली, लेका माझ्याकडं आलं की मी देईन तुला आणून इथं....!

         जाता जाता तिला बोललो , जेव्हा तुला तुझ्या मुलाची आठवण येईल तेव्हा कोणाकडून तरी फोन लाव मला .... कधी पण कर २४ तासात ... मी बोलेन ..... असं म्हणून माझा फोन नंबर एका कागदावर लिहून दिला ..... तिने कौतुकाने तो कागद घेतला आणि हात जोडून लेका येतो परत .... म्हणत केबिन मधून गायब झाली .....! 

      त्यांनतर खूप वेळ विचार केला.... खरं तर या रुग्णांना इथं आल्यावर काय हवं असतं??? फक्त आजारी पडल्यावर उपचार नसतात घ्यायचे... कधी दुःख व्यक्त करायचं असतं तरी कधी फक्त बोलायचं असतं..... जे कोणाशी बोलता येत नाही असं सगळं एका अनोळखी डॉक्टरसमोर फक्त व्यक्त व्हायचं असतं. असं पण मी काय करू शकतो ???? माझ्या हातात काय आहे ??? एखाद्याचं दुःख आपण वाहून नेऊ शकत नाही मात्र वाटून नक्कीच घेता येतं... अन वाटलेलं दुःख हलकं असतं ....! 

        त्यांनतर ती काही दिवसांनी पुन्हा आली .... येताना माझ्यासाठी तांदूळ घेऊन आली होती.. तिच्या आपलेपणाला नाही कसं म्हणता येईल .... मायेचा ओलावा होता त्यात .....देवाला शिव्या देणारी माणसं कधी कधी माणसावर श्रद्धा ठेवतात.


लेखन- डॉ शहाजी मोटे-पाटील




1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने