आणि आज पहिल्यांदा वाटलं हा मुलगा पाहिजे होता...
![]() |
Pic by - Dr. Shahaji Mote-Patil |
आज नेहमी प्रमाणे दिवसभर रुग्णालयात येणारे OPD चे पेशन्ट बघत होतो ... तसंही शासकीय रुग्णालयात रेग्युलर तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे त्याच कारण म्हणजे ...कोरोना ... !
सकाळपासून एक डिलिव्हरीची पेशन्ट आमच्याकडे ऍडमिट होती तिसऱ्या खेपेची असल्यामुळे ती सहज २-३ तासात डिलिव्हरी होईल असा अंदाज होता. मात्र संध्याकाळी ५ वाजले त्यांनतर सिस्टर म्हणाल्या सर आता काय करायचं काहीच प्रोग्रेस नाही ...त्यात सोनोग्राफी सुद्धा ७ व्या महिन्यात केली आहे ...९ व्या महिन्यातली नाहीय ...... मी म्हटलं बघू अर्धा तास नाही तर जिल्हा रुग्णालयात रेफर करू कारण आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आपल्याकडे बेसिक साधनं असल्यामुळे आपण रिस्क पण नाही घेऊ शकत ..... आणि तसं मी नातेवाईकांना कल्पना देण्यासाठी गेलो तर त्या महिलेसोबत तिची दूरची नातेवाईक स्त्री होती त्यांना मी समजावून सांगितलं तेवढ्यात ती गरोदर महिला हात जोडून बोलली डॉक्टर काही पण करा ... माझी इथंच डिलिव्हरी करा ... अन माझी सुटका करा ... माझं असं कोणी नाही जवळचं .... तिच्या डोळ्यात पाणी होतं ... मनाला क्षणभर चटका बसला .... पण स्वतःला सावरून मी विचारलं , नवरा , सासू , सासरे , आई वडील कोणी तरी असेल ना ...?
ति भरल्या डोळ्यांनी सांगायला लागली .... ' वडील २ महिने झाले वारले ... आईला ऐकायला येत नाही ती स्वतः अजून सावरली नाही शिवाय ती खूप घाबरलेली आहे .... सासू अजून इकडे आली नाही .... येईल असं पण वाटत नाही .....!'
मी नवरा कुठाय मग ..?? असा प्रश्न विचारला , ती पुन्हा रडत रडत सांगू लागली ....' मला पहिल्या दोन मुळीच आहेत ... माझी या गरोदरपणासाठी मनस्थिती ठीक न्हवती .... अशक्तपणा वाटत होता...... २ महिने गरोदर असताना तो मी आहे ना .... हे बाळ राहू दे काय होईल ते होईल ....असं बोलून मुंबई ला गेला .... तेव्हा पासून आजपर्यंत मला फोन केला नाही .. मी करायचा तर त्याचा नंबर बंद आहे ....सासुकडे आहे चालू नंबर तिच्याशी होतं बोलणं ....पण सासू नंबर देत नाही .... मी असं ऐकलं की त्याने मुंबईत लग्न सुद्धा केलंय ....मला फसवलं हो डॉक्टर .... रोज त्रास देतात ही लोकं ... पण जायचं कुठे ..?? जगण्यासाठी तिथंच ... दुःख आणि अपमान पचवत दिवस ढकलतेय.... माझी एक मुलगी घरी तापाने फणफणत आहे ....७ व्या महिन्यातली सोनोग्राफी सुद्धा गावातल्या लोकांनी पैसे गोळा करून केली .... सासरी गरिबी आहे असं नाही .... पण ती श्रीमंती माझ्या काय कामाची ... ५ पैसे पण नाहीत माझ्याकडे ..... तुमच्या पाया पडते माझी इथंच डिलिव्हरी करा ....!
माझा मेंदू आता सुन्न झाला होता .... डोळ्यातलं पाणी लपवत काळजी नको करू .... मी करतो ... तू फक्त मनाने खंबीर रहा ... असं आश्वासन दिलं .... कळा यायचं इंजेक्शन देऊ असं सांगून वार्ड मधून बाहेर आलो .... सिस्टर ना सलाईन आणि इंजेक्शन द्यायचं सांगून डिलिव्हरी रूम मध्ये घेतलं .... अपेक्षित कळा येत न्हवत्या ... पण रिस्क घ्यायलाच हवी असा मनोमन विचार केला ... मी काही स्त्रीरोग प्रसूती तज्ञ नाही .... पण म्हटलं चला ....यापेक्षा दुसरा चांगला उपाय सुद्धा नाही .....!
खूप वेळ वाट बघितली आणि संध्याकाळी ७ ला डिलिव्हरी झाली ..... मुलगी झाली .... मी नेहमी मुलगी झाली की खुश होतो .... ते बाळ इतकं गोड दिसत होतं की बस्स ..... विशेष म्हणजे त्याच्या गालावर खळी पडत होती .... बाळाचं वजन केलं ३ किलो होतं ... सगळी प्रक्रिया झाली ... तिच्यासमोर बाळ आणलं ....रडता रडता हसली ती ..... हात जोडून धन्यवाद बोलली ....
शेवटी मीच न राहवून बोलायला सुरुवात केली ... मुलगी आहे म्हणून नाराज होऊ नको .... बघ इतकी गोड मुलगी झालीय .... तुझ्याकडे टकमक करत बघतेय .... तुझ्या आयुष्यातील दुःख भविष्यात तिच्यामुळे च कमी होईल .... यावर ती बोलली .... डॉक्टर, मुलगी झालं म्हणून नाराज नाही मी .... सासू सासरे तिसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून किती त्रास देतील त्याचा विचार करतेय.....या बाळाकडे ढुंकून बघणार सुद्धा नाहीत ..... पण मला चालेल मुलगी झालेली ....मी जगणार आणि मुलांना पण जगवणार... हे बोलताना ती हतबल होती हे मला जाणवत होतं ....!
मी नेहमी प्रमाणे मुली आई बापासाठी किती काही करतात ... कश्या उच्च पदावर जातात ...आभाळाला आपल्या मुठीत घेतात ...इ इ तत्वज्ञानाचे ज्ञान पाजळलं .... मनातून मात्र मला कुठं तरी आज खटकत होतं .... डिलिव्हरी रूम मधून बाहेर आलो ... सिस्टर आणि मावशीने सुद्धा मला कृतज्ञतेने धन्यवाद म्हटलं , मी म्हटलं का ..? मला का धन्यवाद देताय ... सगळं तर तुम्हीच केलं ... मी फक्त मदत केलीय .... त्यावर त्यांचं उत्तर होतं तुम्ही केलेल्या मदतीसाठी नाही ... तर घेतलेल्या निर्णयासाठी थँक्स बोललो ....! मी बाहेर केबिन मध्ये आल्यावर सिस्टर आणि मावशीला बोललो .... २०१५ पासून आतापर्यंत कित्येक डिलिव्हरी केल्या असतील ... चौथी -पाचवी मुलगी झाली तरी मी होऊ दे ना लक्ष्मी घरात आलीय असं दरडावत असायचो त्या मातांना ....आज पहिल्यांदा
सिस्टर मला असं वाटतंय तिला मुलगा व्हायला पाहिजे होता .... मला माहीत नाही मी किती बरोबर अन किती चुकीचा आहे या बाबतीत .... पण त्या मातेच्या खडतर आयुष्यात एक आशेचा किरण म्हणून .... तिला जगण्याची प्रेरणा म्हणून .... तिच्या मानसिक समाधानासाठी .... वेळ बदलली की परिस्थिती बदलेल या विश्वासापोटी.....मुलगा पाहिजे होता ....आज तिच्या बाजूने विचार करतोय .... या मुलींना वाढवेल ती ...आई आहे हो शेवटी .... सांभाळेल ...त्यासाठी सगळं सहन करेल .... मुली मोठ्या होतील .... शिकतील सुद्धा ....अन त्या मातेनं इतकं सोसल्यानंतर चांगले दिवस येतील असं वाटताच त्यांची लग्न होतील सासरी जातील ....पुन्हा त्या मातेच्या नशिबी ....तेच ... अपमान ... आश्रित म्हणून जगणं ....आपण कितीही गप्पा मारल्या तरी लग्नानंतर मुलीचं आयुष्य वेगळं असतं ... त्यांचे पती , सासू , सासरे या मातेला स्वीकारतील का ..? की पुन्हा आश्रित म्हणून मरेपर्यंत ती पडेल कुठल्यातरी वळचणीला .....?
तिच्या नशिबाची परवड या गोड मुलीच्या भविष्यामुळे बंद होवो ... इतकीच देवाकडे प्रार्थना केली अन केबिन मध्ये शून्यात बघत राहिलो ... अन राहवलं नाही म्हणून शेवटी लिहलं... ... कदाचित आज माझं मुलगा की मुलगी यावरून चुकीचा ग्रह झाला असेल त्याबद्दल क्षमस्व ..!
टिप्पणी पोस्ट करा