गव्हाचा केक

Image Source - Google | Image by - piqsels

साहित्य:-

१)एक आणि अर्धी मोठी वाटी गव्हाचे पीठ / आटटा  
२)अर्धी वाटी दुध पावडर (असेल तर उत्तमच)
३)एक वाटी साखर (बारीक करून)
४) पाव वाटी तूप/तेल /बटर 
५)एक वाटी  सायीचे दही ताजे असावे
६)अर्धी वाटी दुध (परत लागले तर वापरू शकतो) 
७)अर्धा चमचा खायचा सोडा (छोटा चमचा)
८)अर्धा चमचा बेकिंग पावडर (छोटा चमचा)
९)चेरी/ड्रायफ्रुट्स थोडेसे
१०)इसेन्स/जायफळ पावडर ,थोडीशी वेलची पावडर 

कृती :-

प्रथम गॅसवर एक मोठे पातेले/कुकर/कढई ठेवणे . गॅस मध्यम आचेवर असावा त्यामध्ये पातेल्याचा तळ बुडेल इतपत मोठी वाळू/मीठ घालणे .त्यामध्ये पातेले ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे जाळीचे स्टॅड किवा कुकर मधील जाळी किवा गॅसवरचे स्टॅड त्यामध्ये ठेवणे.वरून झाकण ठेवणे . कमीत कमी १० ते १५ मिनिटे पातेले गरम करण्यास ठेवणे .
पीठ चाळायच्या चाळणीमध्ये गव्हाचे पीठ त्याबरोबर खायचा सोडा, बेकिंग पावडर घालावी(सहसा बेकिंग पावडर बॉक्सपॅक मधील असावी)एकत्रित दोन ते तीन वेळा चाळून घ्यावी त्यामुळे केक व्यवस्थित फुगतो . नंतर एक मोठ्या बाऊल मध्ये दही एक वाटी तसेच बारीक केलेली साखर ,तूप,जायफळ पावडर घालून सलग पाच मिनिटे हलवा किवा मिक्सरला थोडे बारीक करून घेतले तरी चालेल .त्यामध्ये हळूहळू गव्हाचे पीठ घालून एकाच बाजूने हलवत रहा .जोपर्यंत ते मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत हलवा(कमीत कमी १० मिनिटे ) हे पीठ हलवताना त्यामध्ये लागेल तसे दुध घालत रहा.हे पीठ जास्त घट्ट किवा पातळ नको मध्यम असे हे पीठ असले पाहिजे ,त्यासाठी पळीने पीठ वरून सोडून पहा त्याची तार धरली पाहिजे जर तार धरली असेल तर आपले केकचे मिश्रण बरोबर तयार झाले कारण तार धरली नाही तर केक फुगत नाही त्यामुळे तार धरेपर्यंत मिश्रण हलवत राहा .
मिश्रण योग्य झालेनंतर केकचे भांडे घ्या (केकचे भांडे जर नसेल तर तळ सपाट (प्लेन) असणारे एखादे पातेले/डबा असला तरी चालेल)भांड्याला आतून तूप लावा व आतून गव्हाचे पीठ भुरभुरून घ्या म्हणजे केक करपणार नाही,चिकटणार नाही. तयार मिश्रण भांड्यामध्ये हळुवार सोडा ,सोडायच्या आधी चेरी घाला परत मिश्रण हलवून घ्या.(चेरी आधी मिश्रण हलवताना घातली तरी चालेल)थोडी चेरी भांड्याच्या तळाशी टाका.मिश्रण भांड्यामध्ये हळुवार सगळीकडे एकसारखे पसरावा ते एकसारखे पसरण्यासाठी पातेले थोडे हलवून घ्या म्हणजे मिश्रण व्यवस्थित भांड्यामध्ये पसरेल .वरून थोडेसे काजूचे तुकडे किवा चेरी (थोडीशीच)घाला नाहीतर केक वरून दबला जातो व फुगत नाही.त्यानंतर आपण जे पातेले गॅसवर ठेवले आहे त्याचे झाकण काढून हळुवार ते ‍स्टॅडवर ठेवा ,झाकण झाकून ठेवा . गॅस मंद आचेवर ठेवा .झाकणावर एखादी जड वस्तू ठेवा म्हणजे भांड्यामधून जाणारी वाफ बाहेर जाणार नाही व केक लवकर होईल .हा केक जवळजवळ ५० ते ६० मिनिटांपर्यंत सहज होतो .मध्यांतरी ४० मिनिटानंतर थोडेसे उघडून बघा व परत अंदाजानी तुम्हाला वाटले तर परत १० मिनिटांनी बघा .त्यासाठी छोटा चाकू केकमध्ये घालून बघू शकता जर पिठ न चिकटता तो चाकू सहज बाहेर आला तर केक बरोबर तयार झाला असे समजावे .नंतर भांडे खाली उतरवून घ्या.केकच्या कडा चाकूच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्या. तयार केक गार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये किवा ताटामध्ये पलटी टाका.केक सरळ करून तुमच्या आवडीनुसार सजावट करा.हा केक फार छान,चविष्ट,रुचकर लागतो .

सजावट :-

सजावट करताना तुम्ही क्रीम वापरली तरी चालेल त्यावर आवडीप्रमाणे काजू ,बदाम,चेरी,पिस्ता केकवर लावले तरी चालतील .
महत्वाचे म्हणजे कॅडबरी थोडीशी वाटीमध्ये घेऊन ती वाटी गरम पाणी असलेल्या भांड्यामध्ये ठेऊन मेल्ट करा त्यामध्ये भाजलेले किवा कच्चे शेंगदाणे टाकून एकजीव करा.ते मिश्रण पातळ असताना केकवर पसरा. तसेच डिंक तळून त्यावर टाकला तरी चालेल.तयार केकेची सजावट सुंदर,मोहक दिसेल. 
खाली दिलेल्या टिप अवश्य वाचा.

टीप :- 

१)इसेन्स नसेल तर जायफळ पावडर वापरा . 
२) सहसा तुपच वापरा 
३) दुध पावडरचा वापर नक्की करा
४) दही फ्रीजमधील वापरू नका .
५) केक करण्यापूर्वी ४ तास आधी दही लावले तरी चालेल व सहसा सायीचे दही वापरा .
केक स्पोंजी होतो .
६) साखरेएवजी पिठीसाखर वापरली तरी चालेल .
७)चेरी जरूर वापरा त्यामुळे केकला वेगळा सुंदर लूक येईल व सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स वापरा.
८)बेकिंग पावडर वापरताना हि सावधानता बाळगा कि ती पकेटमधील आहे का नाही ,तर सुट्या पावडरमुळे केक जास्त फुगत नाही कारण ती पावडर जास्त दिवसाची असू शकते .
९)कॅडबरीमध्ये मेल्ट केलेले शेंगदाणे केकवर सजावटीसाठी वापरा ते शेंगदाणे छान लागतात .
१०)तुम्हाला जर केक मोठा हवा असेल तर गव्हाच्या पिठाप्रमाणे बाकीचे सर्व जिन्नस जास्त प्रमाणात वापरा .उदा.३ मोठी वाटी गव्हाचे पीठ असेल तर १ चमचा बेकिंग पावडर व १ चमचा खायचा सोडा ,एक आणि अर्धी वाटी दही,१ वाटी दुध पावडर , एक आणि अर्धी वाटी साखर ,१ वाटी दुध ,बाकीचे साहित्य जरुरीप्रमाणे ..

वैशिष्ट :- गव्हाचा केक हा मैद्याच्या केक पेक्षा पचनास हलका असतो . हा केक लहान मुलांच्या शरीरस्वास्थ्यासाठी उत्तम आहे .

गृहिणी - गितांजली पाडळकर 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने